पिंपरी -गणेश विसर्जनासाठी इंद्रायणी नदीत उतरलेल्या चौघांपैकी दोघेजण बुडाल्याची दुर्देवी घटना मोशी येथे रविवारी (दि. 19) सायंकाळी घडली. यापैकी एकाचा मृतदेह मिळून आला असून दुसऱ्याचा सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरू होता.
दत्ता आबासाहेब ठोंबरे (वय 20) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय 18, दोघेही रा. डुडुळगाव) अशी बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. यापैकी प्रज्वल याचा मृतदेह शोधून काढण्यात आला आहे.तर दत्ता ठोंबरे याचा शोध सुरू आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हवालदार वस्ती, आळंदी रोड येथील इंद्रायणी नदीमध्ये माऊली वस्ती, डुडळगाव येथील ठोंबरे कुटुंबातील सदस्य सायंकाळी सहाच्या सुमारास गणेश विसर्जनसाठी आले होते.
त्यापैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय 30), नितीन अर्जुन ठोंबरे (वय 39), दत्ता आबासाहेब ठोंबरे (वय 20) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय 18) हे चौघेजण गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरले. मध्यभागी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दता ठोंबरे आणि प्रज्वल काळे हे दोघेजण पाण्यात बुडाले. त्या दोघांनाही पोहता येत नव्हते. ते मूर्ती विसर्जन केल्यानंतर आत खोल पाण्यात गेले होते.
एमआयडीसी भोसरी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी त्यांचा शोध घेतला असता. यावेळी प्रज्वल काळे यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला. तर दता ठोंबरे याचा शोध सुरू असून सोमवारी सायंकाळी उशिरा महापालिकेने एनडीआरएफला पाचारण केले.