Nagar : तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच जनतेने घालविले

संगमनेर : एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्ष काम केले. दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले. आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जातीधर्माच्या नावाखाली खोट्या भूलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले असून तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर खुर्द येथील कुबेर लॉन्स येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी, युवक व कार्यकर्त्यांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड.माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, पांडुरंग घुले, आर. बी.रहाणे, अर्चना बालोडे, नवीन संचालक रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विनोद हासे, विजय राहणे, विलास शिंदे, अंकुश ताजणे, दिलीप नागरे, राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर, भाऊराव रहाणे, सरपंच गणेश शिंदे ,मधुकर गुंजाळ, रमेश सुपेकर आदींसह परिसरातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, धर्माच्या नावावर विधानसभा निवडणुकीत जनतेला फसवले गेले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्याची बसवलेली घडी थोडी विस्कटली. सरळ विरोधक परवडले पण दोन्हीकडे राहणारे नको. आपला तालुका कुटुंब आहे. चुकीच्या पद्धतीने वागले तर त्याचा त्रास सर्वांना होतो. हक्काचे पाणी संगमनेर तालुक्याला मिळालेच पाहिजे. तालुक्यातील कालव्यांना प्लास्टरचे काम सुरू झाले. आपली पहिली मागणी होती की, अगोदर आमचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे बारे काढून द्या आणि मग प्लास्टर करा. हे पाणी सर्वांना मिळालेच पाहिजे. ते काम आता होत आहे.
आगामी काळामध्ये प्रति एकरी शंभर टन ऊस उत्पादन करावा लागणार आहे. कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढल्याने राज्यात एक नंबर भाव देणे सातत्याने शक्य होणार आहे. सर्व सहकारी संस्थांचे काम चांगले असून, तालुक्यातील सर्व जनता व विरोधकही मान्य करतात. विधानसभेत चूक झाली असेल परंतु आता सहकारी संस्थांच्याबाबत होणार नाही. झालेल्या चुका दुरुस्त करून सर्वांनी एकजुटीने तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
ॲड.माधवराव कानवडे म्हणाले की, थोरातांचा पराभव हा तालुक्यासाठी मोठा अपघात असून हे झालेच कसे असा राज्याला प्रश्न पडला आहे. यामध्ये कार्यकर्ते कमी पडले असून, तरुणांनी जातीभेदाच्या आमिषाला बळी न पडता संत ज्ञानेश्वर व समतेचा विचार घेऊन काम करावे, असे ते म्हणाले प्रास्ताविक सुभाष पाटील गुंजाळ यांनी केले. रवी नेहे यांनी आभार मानले. यावेळी चंदनपुरी, आनंदवाडी, झोळे, संगमनेर खुर्द, खांडगाव, यशवंतनगर, निमज, सावरगाव तळ येथील सभासद शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





