Nagar : आरोग्य केंद्रांचे आरोग्यच धोक्यात

अहिल्यानगर : सुंदर व स्वच्छ आरोग्य केंद्र असावे, यासाठी शासन विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येत असतांना दुसरीकडे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेसाठी सफाई कर्मचार्यांची नियुक्ती होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छेतेचा बोजवाराच उडाला आहे. आरोग्य केंद्रांची स्वच्छताच होत नसल्याने येथे येणार्या रुग्णांसह केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही केंद्रांमध्ये तर वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना स्वखर्चातून स्वच्छता करावी लागत आहे.
तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेची निविदा काढून 3 हजार 200 कोटीचे काम देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची अंमलबजावणी होण्यापूर्वीच ही निविदा रद्द करण्यात आल्याने राज्यात आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राला सफाई कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येत होती. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या पसिरासह अंतर्गत स्वच्छता होत होती. मात्र आता सफाई कर्मचार्यांची नियुक्ती गेल्या काही वर्षांपासून झालीच नाही. आहे त्या सफाई कर्मचार्यांच्या वारसांना त्यांच्यानंतर संधी देण्याचे आदेश आहे. परंतू त्या वारसांना त्यांच्या शिक्षणनुसार पद मिळत गेल्याने सफाई कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. विशेष म्हणजे आरोग्य केंद्रांमधील सफाई कर्मचार्याची संकल्पानास संपुष्ठात आली आहे.
जिल्ह्यात 104 प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यापैकी यापूर्वीची 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी एक सफाई कर्मचारी पद मंजूर आहे. परंतू आता त्यापैकी केवळ 39 ठिकाणी सफाई कर्मचारी आहे. सध्या 57 सफाई कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत.त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेसह साफसफाईचा प्रश्न चांगलाच भेडसावत आहे. आरोग्य केंद्र सुंदर व स्वच्छ दिसावीत, म्हणून आरोग्य विभागाकडून कायाकल्प आणि स्वच्छता, व राष्ट्रीय गुणवत्ता मिशन कार्यक्रम दरवर्षी राबवून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना विविध पुरस्कार देते. परंतू या आरोग्य केंद्रांच्या मुळ स्वच्छता कोणी करायची यासाठी सफाई कर्मचार्यांच्या नियुक्ती शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
सफाई कर्मचारी नसल्याने आरोग्य केंद्रांची स्वच्छता होतांना दिसत नाही. परिसर स्वच्छतेचा तर प्रश्न येत नाही. आरोग्य केंद्रांमधील बाह्य रुग्ण तपासणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, यासह रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला कक्ष हे दररोज स्वच्छ होणे आवश्यक आहे. पण सफाई कर्मचार्याअभावी हे स्वच्छता नियमित होत नाही. सध्या तरी रुग्ण कल्याण समितीतून काही निधी या आरोग्य केंद्रांच्या स्वच्छतेसाठी खर्च केला जात आहे. पण तो खर्च करतांना मर्यादा असल्याने अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी स्वखर्चातून स्वच्छता करीत आहेत.
त्याबरोबर शिपाई पद देखील गेल्या कित्येक वर्षात भरली गेली नाही. जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 384 पदे मंजूर आहे. पण सध्या अवघे 154 शिपाई असून उर्वरित 230 शिपाई पद रिक्त आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांत चोवीस तास थांबण्यासाठी कर्मचारीच नाही. हे पद भरण्याबाबत वारंवार मागणी झाली आहे. परंतू ही पदे आता न भरण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने आरोग्य केंद्रांमधील सेवा सुविधाही आता रामभरोस झाल्या आहेत.
रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून आरोग्य केंद्रांची साफसफाई करण्यात येत आहे. कल्याण निधी यासाठी वापरण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छता रुग्ण कल्याण समितीमधून होत आहे.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद





