Nagar : शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत पडणार हातोडा, तहसील कार्यालय झालेल्या बैठकीत निर्णय

जामखेड : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या कामास आता वेग येणार असून, शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर येत्या आठ दिवसांत हातोडा पडणार आहे. याबाबतची बैठक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व्यापारी व नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडली. रस्त्याच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, सा.बां.विभाग, नगरपालिका, भूमिअभिलेख व पोलीस प्रशासन यांच्याकडून ही संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येणार आहे.
जामखेड शहरातील अतिक्रमण, राष्ट्रीय महामार्ग व नगरपरिषद अंडरग्राऊंड पाईपलाईन व भूमिगत गटाराचे काम तातडीने होण्यासाठी बुधवारी दुपारी जामखेड तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस तहसीलदार गणेश माळी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी शेळके, लोभाजी घटमळ, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्रा. मधुकर राळेभात, पवनराजे राळेभात, राहुल उगले, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पांडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, तुषार बोथरासह अनेक नागरिक उपस्थित होते.
मागीलवेळी दि. 10 मार्च रोजी देखील तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबत मागील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार गणेश माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राष्ट्रीय महामार्गकडून अतिक्रमण काढण्याबाबत ठेकेदारास सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी कसल्याही प्रकारे सूचनांचे पालन केले नाही. तसेच शहरातील बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल रोडचे काम सुरू केले आहे. विंचरणा नदीच्या पुलावरील एका बाजूचे काम सुरू होऊन एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला आहे.
हापटेवाडी येथील मंदिर ते सौताडा घाट पायथ्यापर्यंत अतिक्रमण काढून रस्त्याचे काम करण्यासाठी रस्ता मोकळा केला आहे. सौताडा घाटातील बाराशे मीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. शहरातील खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतची पक्की अतिक्रमणे आठ दिवसांत हटविण्यात येणार आहे. 25 मार्च रोजी भूमिअभिलेख कार्यालय, जामखेड नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्या संयुक्त रितीने मोजमाप व खुणा करून सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सांगितले की, संबंधित विभागाच्यावतीने रितसर मोजणी करून अतिक्रमण हटवण्यात येणार आहेत. तसेच लगेच याठिकाणी भुयारी गटार व पाणीपुरवठा योजना पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येणार आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरूआहे. या ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत अनेकांची निवेदने मला प्राप्त झाली आहेत. याबाबत पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्यावतीने चौकशीचे काम सुरू आहे. लवकरच दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूआहे, अशी माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली.
अतिक्रमण काढण्यास अडथळा केल्यास गुन्हा दाखल
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी पक्की अतिक्रमणे तसेच लाईटचे पोल बाजूला हटवण्यात येणार आहेत. मात्र या कामास कोणी अडथळा आणला तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे.





