Nagar : बालकामगारांचे शोषण थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नेवासा : बालकामगारांचे हक्क आणि शिक्षण कायदा चक्क धाब्यावर बसवून बालकामगार विरोधी कायद्याची नेवासा तालुक्यात पायमल्ली केली जात आहे. हॉटेल्स, खाणावळी, बिअरबार आणि चक्क शेळ्या – मेंढ्या राखण्यासाठी लहान मुलांना कामावर ठेवून कोणी सालगडी म्हणून तर कोणी रोजंदारीवर बालकामगार ठेवून कमी पगारात त्यांच्याकडून जादा श्रम करून घेतले जात आहे.
शासनाच्या नियमाचे पालन करण्याचे नाटक करून ‘येथे बालकामगार नाहीत? असा फलक मोठ्या राणाभिमदेवी थाटात लावून चक्क बालकामगारांचे शोषण नेवासा तालुक्यात सुरू आहे. या कोवळ्या मुलांना शिक्षणासापासून वंचित ठेवले जात असल्याचे दिसून येत आहे. बालकामगार ठेवलेल्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अंजूम पटेल यांनी दिला आहे.
नेवासा तालुक्यात कमी पगारात जादा श्रम या बालकामगारांकडून करून घेऊन चक्क नेपाळहूनही अनेक कामगार हॉटेलात कामाला ठेवण्याचा प्रताप केला जात आहे. गोरगरीब लोकांची अर्थिक नाडी ओळखून अनेक स्थानिक बालकामगार तालुक्यात श्रम करताना दिसून येत आहेत. अगदी शेळ्या – मेंढ्या राखण्यापासून तर हॉटेल आणि अन्य ठिकाणी हे बालकामगार सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करताना दिसून येत आहे.
अनेक ठिकाणी या बालकामगारांना मारहाणही होत असताना शासनस्तरावरून याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे बालकामगारांची कामावरून वेळीच मुक्तता करण्यात यावी, अन्यथा शहर कॉंग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पटेल यांनी दिला.





