Nagar : संगमनेरला सहकार न्यायालय सुरू करा – आ. खताळ

संगमनेर : संगमनेर आणि अकोले तालुक्यातील सहकार न्यायालयीन प्रकरणे कोपरगाव येथे प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये सहकार न्यायालय सुरू करावे, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संगमनेर हे भौगोलिक व प्रशासकीय दृष्टिकोनातून मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे सहकार न्यायालय सुरू झाले. सहकार क्षेत्रातील हजारो नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळेल आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होईल, यासाठी संगमनेर शहरातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा उपयोग सहकार न्यायालयासाठी करण्यात यावा, अशी मागणी आ. खताळ यांनी सहकारमंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.
सध्या कोपरगाव येथे असलेल्या सहकार न्यायालयात संगमनेर आणि अकोले तालुक्यातील सुमारे २०० प्रलंबित प्रकरणे आहेत, तर केवळ २५ प्रकरणे कोपरगाव तालुक्यातील आहेत. अकोले तालुक्यातील नागरिकांना कोपरगावला पोहोचण्यासाठी ८० ते १०० किमीचे अंतर पार करावे लागते, तर संगमनेर तालुका ५५ किमी अंतरावर आहे.
त्यामुळे या दोन तालुक्यांच्या न्यायहक्काच्या दृष्टीने संगमनेर येथे सहकार न्यायालय सुरू करणे आवश्यक आहे. या मागणीला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मागणीचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले.





