Nagar : रस्त्याच्या कामाचा एसटी बसला फटका

अहिल्यानगर : शहरातील तारकपूर रस्त्याचे काम काही महिन्यांपासून अर्धवट असल्याने तारकपूर बसस्थानकात एसटी बसेस येण्यास बंद झाल्या असून, बस स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक अडचणींचा सामना करून प्रवाशांना एसटी धरावी लागत असून, तारकपूर आगार व्यवस्थापकाने पूर्वीप्रमाणे एसटी बसेस बसस्थानकात येण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
तारकपूर रस्त्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. तारकपूर बसस्थानक समोरील एका बाजूचे काम पूर्ण झाले असून, उर्वरीत बाजूचे काम प्रलंबित आहे. मात्र, वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण पुढे करून बसस्थानकात येणाऱ्या बसेस सकाळी 9 नंतर येण्याच्या बंद झाल्या आहेत. मोजक्याच काही बस येत असल्याने त्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. तारकपूर बसस्थानक येथून विविध कामानिमित्त गावाकडे आणि इतर शहरामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे.
गावाला आणि विविध शहरात जाणारे नागरिक तारकपूर बस स्थानकात येतात, मात्र बस येणार की नाही याची शाश्वती नसल्याने हिरमोड होवून माळीवाडा बस स्थानकाकडे वळतात.
परिणामी तारकपूर येथील प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. काही बस आल्यास त्यामध्ये बसण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. एसटी बस गाड्या तारकपूर बस स्थानकावर न थांबता माळीवाडा बसस्थानक किंवा पुणे बसस्थानकावर थांबून पुढे जात असल्याने बस धरण्यासाठी महिलांसह लहान मुले, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची कसरत होत आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या तारकपूर बस स्थानकात न थांबता पुढे जात आहे.
यासाठी नागरिकांना डीएसपी चौकात थांबून एसटी धरण्याची वेळ येत आहे. रस्त्याचे काम दोन ते तीन महिन्यांपासून सुरु असल्याने तारकपूर बस स्थानकातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे. माळीवाडा बस स्थानकाचे देखील नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने तेथे देखील एकाचवेळी अनेक एसटी बसेस येत असल्याने जागेची कमतरता भासत आहे. हा ताण पूर्णत: स्वास्तिक चौक येथील पुणे बस स्थानकावर येत असून, कमी जागा असताना तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.





