शिर्डी :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचा सर्वोच्च न्यायालयातील निर्णय झाला तर पुढील तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजपच्या राज्य अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीस यांनी संवाद साधला. यात त्यांनी महापालिका निवडणुकीवर भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी व्होट जिहाद करण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांनी अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला. राज्यात अराजकतावादी संघटना काम करीत आहे. अराजकतावादी संघटनेविरुद्धची लढाई आता आपल्याला जिंकायची आहे,असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले की, वोट जिहाद भाग 2 म्हणून बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात जन्म प्रमाणपत्रे मागत आहेत. नाशिकमधील अमरावती आणि मालेगाव तालुक्यात अशी जवळपास 100 प्रकरणे समोर आली आहेत. हे लोक सुमारे 50 वर्षे वयाचे, बेकायदेशीरपणे कागदपत्रे मिळवत आहेत. एकाही घुसखोराला महाराष्ट्रात राहू दिले जाणार नाही. महायुती सरकार जाती आधारित आणि सांप्रदायिक विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या अराजकतावादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी वचनबद्ध आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, आपण तयार आणि एकजूट राहिले पाहिजे. ‘एक हैं ते सुरक्षित हैं’ या पंतप्रधानांच्या मंत्राने आम्हाला मार्गदर्शन केले. मुंबई, ठाणे आणि नागपूरसह अनेक नागरी संस्थांच्या निवडणुका 2022 च्या सुरुवातीपासून प्रलंबित आहेत.

ओबीसी कोट्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून येत्या तीन ते चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येतील. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले. आम्हाला नवीन आव्हाने स्वीकारायची आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या यशावर विसंबून नाही, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांत भाजप हा एकमेव पक्ष आहे, ज्याने सलग तीन निवडणुकांमध्ये 100 जागांचा टप्पा ओलांडला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने आम्हाला आत्मविश्वास दिला आणि भाजपला 89 च्या स्ट्राइक रेटने 132 जागा मिळाल्या, असे ते म्हणाले.

साईबाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भाजपत महत्वाचा आहे. राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आणि नंतर सबुरी म्हणजे आपण. हा मंत्र आपण सर्वजण पाळत असतो. आपल्याला माहिती आहे की, ज्यांना हा मंत्र समजला ते सर्व यशस्वी झाले. पण श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांना समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं, असं म्हणत विरोधकांवर टीका केली.