राजूर : तालुक्यातील राजूर येथील हॉटेलला सकाळी ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारील किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. मात्र, गावातील तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठी वित्तहानी टळली. दरम्यान, हॉटेलमधील गॅस शेगडीची नळी निसटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. राजूर येथील मुख्य बाजारपेठेतील बाळू बुरुड यांच्या हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे सकाळी ११ च्या सुमारास आग लागल्यामुळे एकच धावपळ उडाली. हॉटेलमधील गॅसटाकीने मोठा भडका घेतल्याने आगीने मोठं रौद्ररूप धारण केले होते. शेजारीच असलेले पालक मेहता यांचे किराणा दुकानातही आग शिरल्याने आगीने भीषण रूप धारण केले. राजुर येथील सर्व तरुण मुलांनी मिळेल त्या साहित्याने पाणी आणत आग विझवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे राज्यात हिंदू-मुस्लिम वाद चालू असताना राजूरमध्ये हिंदू-मुस्लिमाचे एकोप्याचे दर्शन घडताना दिसून आले. राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात येण्यासाठी अकोले नगर पंचायतच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व व्यापारी वर्ग यांनी मोठी मदत करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नसली तरी दोन्ही दुकानाचे साधारण तीन ते चार लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. आदिवासी भागात दिवसेंदिवस आग तसेच वणवा वाढण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे राजूर येथे अग्निशमन बंबाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी राजूर ग्रामस्थांकडून होत आहे.