Nagar : महावितरणचा थकबाकीदारांना शाॅक

अहिल्यानगर : महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या २ लाख १ हजार ९६१ ग्राहंकांकडे सद्यस्थितीत जवळपास ३२३ कोटी ६९ लाख रुपये थकबाकी आहे. महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अहिल्यानगर मंडलात मार्च महिन्यात २ हजार ४५४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यांतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण १ लाख ७५ हजार ग्राहकांकडे १८ कोटी ८४ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील १४ हजार ४३९ ग्राहंकांकडे ४ कोटी २७ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील १ हजार ७२२ ग्राहकांकडे २ कोटी ६७ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील ३ हजार ७६८ ग्राहकांकडे २१९ कोटी ६३ लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ६७४ ग्राहकांकडे ८२ कोटी ७९ लाख रुपये थकबाकी आहे. अशी एकूण अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे ३३२ कोटी ६९ लाख रुपये थकबाकी आहे.
दरमहा सातत्याने पाठपुरावा करून ग्राहकांना नित्यनेमाने संपर्क करून सुद्धा वीजबिलांची थकबाकी महावितरणसाठी चिंतेचा विषय आहे. ग्राहकांना वेळेत वीज बिल भरता यावे तसेच ग्राहकांच्या वीज वापराबाबत व बिलाबाबत पारदर्शकता यावी यासाठी ग्राहका़नी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडींग, वीज बिलाचे व इतर अनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरणची पथके तयार करण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाईलाजास्तव कठोर पाऊले घेत वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे. या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर सदर ग्राहकाने वीज देयकाच्या थकबाकीची रक्कम व ग्राहक वर्गवारीनुसार पुनर्रजोडणी शुल्क (जीएसटीसह) भरल्यानंतर भौगोलिक भागानुसार साधारणतः पुढील २४ तास अवधीपर्यंत त्या ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत जोडणी करण्यास लागू शकतो. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.





