राहुरी : वडनेर येथे बिबट्याचा हल्ल्यात शेतकरी ठार झाल्यानंतर या भागात पिंजरा लावण्यात आला होता. दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद झाले आणि तिसरा बिबट्या पिंजऱ्याबाहेर उभा असे चित्र वडनेरमध्ये आज समोर आले. गावोगावी वाढती बिबट्यांची संख्या आणि मानवावरील हल्ले हा गंभीरपणे समोर विषय आला आहे. तालुक्यात दोनशेहून अधिक बिबटे आहेत, असे सांगितले जाते आहे. वडनेरचे शेतकरी शोभाचंद गव्हाणे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबटे पकडण्यासाठी मोहीम सुरू केली . शेतकऱ्यास ठार केलेल्या घटनास्थळी पिंजऱ्यात सोमवारी रात्री एक बिबट्या जेरबंद झाला. तर ठिकाणापासून अवघे ५०० फूट अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी रात्री पुन्हा एक बिबट्या अडकला गेला. यावेळी या पिंजऱ्याच्या बाहेर अजून एक भला मोठा बिबटया बराच काळ उभा असल्याचे दिसून आले. तर शेतात एक बिबटया आढळून आला आहे.दरम्यान, या ठिकाणी वनविभाग अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक किरण गव्हाणे, महेश गव्हाणे, अशोक गव्हाणे व शेतकरी उपस्थित होते. वडनेर भागात आणखी बरेच बिबटे असून, वनविभागाकडून त्यांना पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.