Nagar : वैफल्यातून विरोधकांकडून वावड्या

संगमनेर : विरोधकांनी तालुक्याचे विभाजन होणार असल्याच्या वावड्या उठवल्या. विरोधकांकडे राजकीय अजेंडा नसल्याने वैफल्यातून हा प्रकार पुढे आणला आहे. संगमनेर तहसील कार्यालयाचे विभाजन होऊन आश्वी या ठिकाणी अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव परिपूर्ण नसून ज्या गावांना याबाबत तक्रार आहे, अशा गावांना तसेच संगमनेर तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊनच अपर तहसील कार्यालयाचा निर्णय घेणार असल्याची माहितीआमदार अमोल खताळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संगमनेर शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार खताळ यांची पत्रकार परिषद पार पडली. आमदार खताळ म्हणाले की, शासनाच्या वतीने काही धोरणात्मक निर्णय घेण्यात येतात. त्यानुसारच नाशिक विभाग अतंर्गत १४ ठिकाणी हा निर्णय झालेला आहे, परंतु संगमनेर तालुक्यातील जनतेला मान्य नसेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच अपर तहसील कार्यालयाबाबत निर्णय घेऊ. त्याचबरोबर तहसील कार्यालयमध्ये जी गावे घेण्यात येणार आहे, याबाबतचे सोशल मीडियावर विरोधकांनी चुकीचे संदेश पाठवले.
त्यामुळे जनतेमध्ये एक वेगळा काही गैरसमज निर्माण झाला, परंतु याबाबत मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री रामदास राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा केली. असा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तहसील कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्याने हा कागद बाहेर आणला, त्याचा शोध घेतला जात आहे. एखादा विषय हाती घ्यायचा आणि त्याला खतपाणी घालायचे व जनतेची माती भडकवायची अशा प्रकारचे काम विरोधकांचे सुरू आहे.
जनतेचा सोयीनुसार निर्णय घेणार असून, अगोदर मंडल रचना होईल, नंतरच जनतेच्या म्हणण्यानुसार निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर येत्या दोन ते तीन महिन्यात संगमनेर जिल्ह्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहे. अपर तहसील कार्यालयाबाबतचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने तालुक्यातील जनतेने घाबरून जाऊ नये. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे रस्ता रोको आंदोलन करू नये, असे आवाहन केले.





