Nagar : वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा बँकेसमोर धरणे आंदोलन

अहिल्यानगर : आरक्षणाची तरतूद डावलून जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला विरोध करण्यासाठी 3 मार्चपासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आणि सहाय्यक निबंधक गणेश औटी यांना मागण्यांचे स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, अमर निर्भवणे, विनोद गायकवाड, गणेश राऊत, दिलीप साळवे, लताताई भांड, प्रकाश साळवे, दिलीप साळवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा सहकारी बँकेची भरतीत आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या जाहीर झालेल्या भरतीमध्ये विविध समाज घटकांच्या आरक्षणाची तरतूदीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सरळ भरतीने संविधानाच्या कलम 340, 341, 342 कडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग केला जात आहे. ही भरती बेकायदेशीरपणे संविधानाचे उल्लंघन करून होत असून, समाजातील वंचित घटकावर अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासकीय कर्मचार्यांचे 6 मार्च रोजी सत्याग्रह
नगर (प्रतिनिधी)- सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. 6 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणे सत्याग्रह केले जाणार आहे. या आंदोलनात कर्मचार्यांना सहभागी होण्याचे आवाहन समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक रावसाहेब निमसे व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात हे आंदोलन केले जाणार आहे. विविध हक्कांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. चर्चासत्र, पत्र व्यवहार करुन देखील शासनाची प्रलंबीत मागण्यांसाठी उदासीनता दिसून येत आहे. या विरोधात तीव्र संघर्षाचे रणशिंग फुंकण्यापूर्वी धरणे सत्याग्रह आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले जाणार असल्याचे म्हटले आहे.





