Nagar Parishad Fund – शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषदेच्या प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना आमदार निधीतून एक कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली. नगरपरिषदेच्या आढावा बैठकीदरम्यान शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी ही घोषणा केली. नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, पक्षप्रतोत इंद्रकुमार ओसवाल, पक्षप्रतोद सत्यम खांडगे, गटनेत्या हेमलता खळदे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, विविध विभागांचे विभाग प्रमुख तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.या बैठकीत आमदार शेळके यांनी शहरातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडून समजून घेत त्यावर उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.शहरातील विविध भागांचा संतुलित विकास व्हावा यासाठी प्रत्येक प्रभागाला आमदार निधीतून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र हा निधी प्रभावीपणे वापरण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन विकासकामांचा पाठपुरावा करावा, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.