Nagar: डिंभे – माणिकडोह बोगद्यासाठी आता आरपारची लढाई

श्रीगोंदा : कुकडीचा पाणी प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. त्याच तुलनेत डिंभे धरणाचा विचार केला तर हे धरण कुकडी प्रकल्पाचा आत्मा आहे. या धरणावर कुकडीचे भवितव्य अवलंबून आहे. डिंभे ते माणिकडोह बोगदा व्हावा, ही अनेक वर्षांची मागणी आहे. बोगदा होण्यासाठी आपण लवकरच जन आंदोलन उभा करणार असून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आपली आरपार लढाईची तयारी असल्याची भूमिका खा. नीलेश लंके यांनी व्यक्त केली.
खा. लंके हे टाकळी लोणार येथील हरिनाम सप्ताहासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खा.लंके म्हणाले, मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण कुकडीच्या पाणी प्रश्नावर जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेला अनुसरून उद्याची लढाई करण्याची आपली तयारी आहे. मागील आवर्तना दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. आवर्तना दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क साधून पाणी मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर आपण वारंवार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी देण्याबाबत सूचना केल्या.
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कुकडीचा पाणी प्रश्न महत्वाचा आहे. उन्हाळ्यात येणारी पाण्याची अडचण कायमची सोडविण्यासाठी डिंभे ते माणिकडोह हा बोगदा होणे गरजेचे आहे. ही मागणी आजवर फक्त कागदावर राहिली. या बोगद्याचे राजकीय भांडवल न करता यावर शाश्वत उपाय करावा लागणार आहे. बोगदा होऊ नये यासाठी पुणे जिल्ह्यातील काही मंडळीचा विरोध असला तरी हा विरोध झुगारून बोगदा कसा होईल, यासाठी आपला पाठपुरावा सुरू राहणार आहे. यापूर्वीही आपण जलसंपदा विभागाचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना भेटून पत्रव्यवहार केला आहे.
या बोगद्यासाठी मोठे आंदोलन उभा करावा लागणार आहे अन् ते आंदोलन करण्याची आपली तयारी आहे. हा बोगदा झाल्यास अधिकचे तीन ते चार टीएमसी पाणी आपल्या भागाला मिळू शकते. उन्हाळ्यात येणारी पाण्याची अडचण सुटण्यास मदत होईल. विसापूर खालच्या शेतकऱ्यांनाही प्रत्येक आवर्तनावेळी येणारी अडचण या अधिकच्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे संपणार आहे. यावेळी आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे, कोसेगव्हानचे उपसरपंच भीमराव नलगे, आप्पासाहेब रोडे, प्रा.संजय लाकूडझोडे उपस्थित होते





