शिर्डी : पालकमंत्री होणे ही एक जबाबदारी असते. मात्र, मी त्या पदावर नसलो तरीही जनतेची सेवा करत राहीन. पदावरून वाद वाढवण्याची काहीच गरज नसल्याचे मंत्री छगन भुजबळांनी सांगत नाशिकच्या पालकमंत्रीबाबच्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीतील ही त्यांची पहिलीच भेट असून, दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर मोकळेपणाने आणि स्पष्ट भाषेत आपली मते मांडली. भुजबळ म्हणाले, “लहानपणापासून मी साईबाबांवर श्रद्धा ठेवली आहे. मंत्रीपद असो वा नसो, मी नियमित शिर्डीत येतो. काही धार्मिक स्थळं अशी असतात की, तिथं गेलं की मन आपोआप शांत होतं. आज साईचरणी मी नव्या जबाबदाऱ्यांसाठी आशीर्वाद मागितला आहे. राज्यातील रेशन दुकानांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारांबद्दल भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली. कोरोनाकाळात आपले हमाल, चालक आणि अधिकारी यांनी रेशनचे कार्य चोखपणे पार पाडले. मात्र, काही दुकानांत अपप्रवृत्ती आढळल्या आहेत. अशा प्रकरणांवर नागरिकांनी तक्रार केली, तर तात्काळ कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले, या निर्णयामुळे समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा लाभ खऱ्या गरजूंनाच मिळावा, यासाठी जनतेनेही जागरूक राहायला हवे. मी आतापर्यंत दहा वेळा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजकारणात मंत्रीपद येतं आणि जातं, पण सेवा हीच खरी ओळख असल्याचे मंत्री भुजबळांनी सांगितले.