Nagar : छत्रपती संभाजीराजे पतसंस्थेत २० लाखांचा अपहार

पारनेर : तालुक्यातील जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती संभाजीराजे पतसंस्थेच्या सुपा शाखेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने सन २०२३ – २०२४ या आर्थिक वर्षात २० लाख २१ हजार २१८ रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासबंधीची फिर्याद लेखापरीक्षक दादासाहेब निवृत्ती गायकवाड यांनी दिली. या पतसंस्थेचे तत्कालीन सुपा शाखा व्यवस्थापक सुरेश बबन ठुबे (रा.माळगल्ली पारनेर) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखापरीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, छत्रपती संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. पारनेर या संस्थेत तत्कालीन शाखाधिकारी, सुपा शाखा व मॅनेजर सुरेश बबन ठुबे यांनी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत सुपा शाखेत २० लाख २१ हजार २१८ रुपये रकमेचा बनावट कागदपत्रे, बनावट खाते तयार करून, तसेच आर्थिक ताळेबंदचे किर्द मध्ये बदल करून संस्थेच्या रकमेचा अपहार केला आहे.
सदरची रक्कम व्यक्तीगत लाभासाठी वापरून संस्थेमध्ये आर्थिक अपहार करून संस्थेच्या रकमेची फसवणूक केली आहे. यासंबंधीचा लेखापरीक्षण अहवाल पाठविल्याने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी अंतर्गत लेखापरीक्षण अहवालात नमूद बाबीचे चाचणी लेखापरीक्षण केले. त्यानंतर तत्कालीन शाखाधिकारी सुपा व मॅनेजर सुरेश बबन ठुबे यांचेविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार अमोल धामणे करत आहेत.





