Nagar : जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर लगड

श्रीगोंदे : जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीवर पंचायत समितीचे माजी सभापती, कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांची सरपंच प्रतिनिधी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
जिल्हा परिषदेची नियोजन समिती पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक तालुक्याला निधी वितरित करून विकासकामे मार्गे लावण्यासाठी काम करते. या समितीच्या सदस्यपदी प्रत्येक तालुक्यातून एक सरपंच सदस्य नियुक्त करण्यात येतो. नियुक्त सरपंचांच्यामार्फत तालुक्यातील सर्व सरपंचांना मार्गदर्शन करणे, त्यांची प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, तसेच या वित्त आयोगामार्फत संपूर्ण तालुक्यात योग्य प्रमाणात निधीचे वाटप करणे, अशी विविध कामे मार्गी लावण्यात येतात.
श्रीगोंदा पंचायत समितीवर सभापती म्हणून काम करताना लगड यांनी सर्वांना सोबत घेऊन कारभार केला. कोळगावचे सरपंच म्हणून काम करताना अल्पावधीतच गावात विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करत कामे सुरू करत गावाच्या विकासात भरारी घेतली.
सदस्य म्हणून काम करताना सर्व गावांना जास्तीत-जास्त निधी उपलब्ध करून देत विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुरुषोत्तम लगड यांनी सांगितले.





