Nagar : कोपरगाव पोलिसांनी ७५ गायींना दिले जीवदान

कोपरगाव : गोवंश जनावरांची कत्तल करणे कायद्याने गुन्हा असला तरी कोपरगाव शहरातील संजयनगर, आयशा काॅलनी, हाजी मंगल कार्यालय परिसरात तोच गुन्हा पुन्हा पुन्हा होतोय. बेकायदा कत्तलखाने चालवून गोवंश जनावरांची बेसुमार कत्तल केल्याच्या घटना अनेकवेळा उघड झाल्या. अशाही परिस्थितीत कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी चमकदार कामगिरी करीत गेल्या एक वर्षात खाटकांच्या तावडीतून तब्बल ७५ गोवंश जनावरांची सुटका करून जीवदान दिले आहे.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले की, गोवंश जनावरांचे संरक्षण करणे जरी पोलिसांचे काम नसले तरीही पोलीस गोवंश हत्या करणाऱ्यांना व बेकायदा कत्तलखाने चालविणाऱ्यांना कधीच सोडणार नाही. आजपर्यंत पोलिसांनी कारवाया करून शेकडो गोवंश जनावरे कसायाच्या दावणीतून सोडविण्याचा विक्रम केला आहे. शहर पोलिसांच्यावतीने जानेवारी ते डिसेंबर २०२४ पर्यंत केवळ एका वर्षात १० गुन्हे दाखल करून ९ लाख ३६ हजार रुपये किंमतीच्या ४४ गायींची सुटका करीत त्यांना गोशाळेत पाठवून जीवदान दिले आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई केली नसती तर गायांची कत्तल झाली असती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोवंश जनावरांना जीवदान मिळत आहे.
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी म्हणाले की, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्यावतीने वेळोवेळी कारवाई करून जानेवारी ते डिसेंबर २०२४ या एक वर्षात ४ लाख ३२ हजार रुपये किंमतीच्या ३१ गायींना खाटकांच्या तावडीतून सुटका करून त्यांना सुखरूप गोशाळेत पाठवण्यात आले. ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यावर काटवणाच्या आत बांधून ठेवलेले गोवंश जनावरे पकडण्यात तालुका पोलीस स्टेशनला यश आले. संशयास्पद गाड्या अडवून तपासणी केले असता अनेक गायी हाती लागल्या. एका वर्षात ७ मोठ्या कारवाया करून पोलिसांनी कायद्याचे तंतोतंत पालन केले आहे. कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी मिळून १३ लाख ६८ हजार रुपयांच्या ७५ गायी पकडून चमकदार कामगिरी करीत गोरक्षण केले आहे. पोलीस हे केवळ कायद्याचे रक्षण नाहीत तर ते गोरक्षक आहेत, हे त्यांच्या कामगिरीवरून दिसून येते.
बजरंग दलाचे कार्यकर्ते व गोरक्षक दलाचे कार्यकर्ते पोलिसांच्या मदतीला धावून जातात. त्यामुळे अनेक गोवंश जनावरांची खाटकांच्या तावडीतून सुटका होते. यापुढे पोलिसांबरोबर इतरांनी लक्षपूर्वक कार्य केले तर कत्तलीसाठी जाणारे बहुतांश जनावरे वाचू शकतात. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांनी गोवंश हत्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे काळाची गरज आहे.





