Nagar : खरीप हंगामाचा ४५ कोटी २३ लाखांचा विमा मंजूर : आ. राजळे

शेवगाव : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात झालेल्या पाऊस व वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यापोटी विमा कंपनीकडून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४५ कोटी २३ लाख रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम लगेच वर्ग करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.
शेवगाव व पाथर्डी तालुक्यात खरीप हंगामामध्ये काही महसूल मंडळामध्ये अधिक पाऊस झाला, तर काही मंडळामध्ये संततधार लागून राहिलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजरी, तूर, कापूस, मुग, सोयाबीन व खरीप कांदा या पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत नुकसानीबाबत विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार केली होती.
या नुकसानीची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी होऊन व्यापक नैसर्गिक आपत्ती (WSL) अंतर्गत शेवगाव तालुक्यातील मुंगी व बोधेगाव मंडळातील ३५३१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या २४३४ हेक्टर क्षेत्राच्या नुकसान भरपाईपोटी एक कोटी १३ लाख ८२ हजार व पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर व खरवंडी मंडळातील ३२२६ शेतकऱ्यांना त्यांच्या १४०८ हेक्टर क्षेत्राची ४८लाख ४४ हजार नुकसान भरपाई मिळाली.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती (LC) अंतर्गत शेवगाव तालुक्यातील ३४,५६९ शेतकऱ्यांच्या २१,३६३ हेक्टर क्षेत्रासाठी ३० कोटी ३९ लाख ९५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. पाथर्डी तालुक्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत २९,५९८ शेतकऱ्यांच्या १२,६५५ हेक्टरसाठी १३ कोटी २० लाख ९५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली.
एकूण मतदारसंघात २०२४ च्या खरीप हंगामाच्या पीक नुकसानीपोटी ४५ कोटी २३ लाख रुपयांचा पिकविमा प्राप्त झाला असून त्यासाठी आमदार राजळे यांनी पिक विमा मिळण्यासाठी शासनाकडे व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्यं लाभले.





