Nagar : एकवेळ भूक मिटेल पण लागलेली तहान भागवा, पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवा – बिपीन कोल्हे

कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीचा पूर्वीचा इतिहास पाहता भुसारासाठी सर्वोत्तम बाजारपेठ होती. काळानुरूप खाजगी बाजार समित्या आणि पाण्याच्या तुटवडा यामुळे बाजार समितीला स्पर्धात्मक वातावरण झाले आहे. मंचावर सर्वच पक्षाचे नेते आता एकत्र आहे. त्यामुळे जसे इतर प्रश्न सुटतात तसे या पंचवार्षिकमध्ये केवळ फक्त पाणी हा एकमेव प्रश्न घेऊन आपण विधानसभा आणि मंत्रालय पातळीवर मैदानात उतरल्यास पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवून मोठा प्रश्न सुटू शकतो, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) येथील जागेचा भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी आ.आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, पोहेगाव नागरी पतसंस्था चेअरमन नितीनराव औताडे, जेष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, कोल्हे कारखाना व्हा.चे.राजेंद्र कोळपे, शंकरराव चव्हाण, जागा मालक बाळासाहेब वाघ, बाजार समिती सचिव नानासाहेब रणशूर आदी उपस्थित होते.
राजकीय नेत्यांनी एकोपा दाखवत स्व.कोल्हे आणि स्व.काळे यांच्या प्रेमाने एकत्र येऊन मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठी लढणे गरजेचे आहे.आमचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून सुरूआहेतच मात्र विधानसभेत आमदार आशुतोष काळे यांनी तर राजेश परजणे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरून कोपरगावचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करावे व जिथे आवश्यकता आहे तिथे आम्हीही येण्यास तयार आहोत,न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे.
मात्र कोपरगावच्या दृष्टीने राजकीय दुर्मिळ योग आहे, यात आता हा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, असा आग्रह कोल्हे यांनी धरला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व आजी माजी संचालक, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखाना, कर्मवीर शंकरराव काळे सह. साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती विविध संस्था आणि ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच, शेतकरी बांधव उपस्थित होते.





