नगर : ‘आमच्या ठेवी आम्हाला परत द्या’ ; दूधगंगाच्या ठेवीदारांचे उपोषण सुरूच

संगमनेर – 81 कोटींचा घोटाळा करून फरार असलेले दूधगंगा नागरी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे व बाकी इतर आरोपी यांना तात्काळ अटक करावी व ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी शनिवारी ठेवीदारांनी प्रांत कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू केले असून रविवारी दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच आहे. खा. सदाशिव लोखंडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलकांना कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नसून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासित केले.
संगमनेरच्या सहकार क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे, त्याचे कुटुंबीय आणि इतर 21 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्यापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी कुटे याच्यासह त्याचे कुटुंबीय व इतर आरोपी फरार आहेत.
भाऊसाहेब कुटे व त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. इतर आरोपींवरही प्रशासनाने अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे संतप्त ठेवदारांनी सांगत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आमच्या ठेवी परत मिळाव्या, या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचे यावेळी सांगितले.
याप्रकरणी काही आरोपी अटकेत असून काही जणांना जामीन मंजूर झाला आहे. यातील मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. पोलीस तपास यंत्रणा या राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या आरोपींपर्यंत पोहोचू शकल्या नाही.





