Nagar : जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या !

अहिल्यानगर : राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील विविध आगारांकडे असलेल्या बसेसची संख्या कमी असून अनेक बसेस जुन्या झाल्याने मार्गामध्ये बंद पडण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व आगारांना नव्या बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
मंत्री सरनाईक यांना पाठविलेल्या निवेदनात खासदार नीलेश लंके यांनी नमुद केले आहे की, राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती जाहीर केल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत जिल्ह्यात सध्या सर्व आगारांच्या मिळून सुमारे 600 बसेस आहेत. गेल्या तीन वर्षामध्ये बसेसची संख्या खूप कमी झालेली आहे. तसेच बसेस जुन्या असल्यामुळे मार्गामध्ये बंद पडतात. काही बसेस स्क्रॅप करण्यात आलेल्या असल्याचे खा. लंके यांनी नमूद केले आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल
बसेसच्या अपुर्या संख्येमुळे खेडया-पाडयात जाणार्या बसेसच्या फेर्या कमी झाल्याने ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाणा-या विशेषतः विद्यार्थी, विद्यार्थिनींचे हाल होत असल्याचे जाणवत असल्याचे खा. लंके यांनी निवेदनात नमुद केले आहे.





