Nagar : शेअर मार्केट ट्रेडिंग नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक

शेवगाव : सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी गजाआड केले. या आरोपीने अनेकांना जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट ट्रेडिंग नावाखाली एक कोटी सोळा लाख रुपयांना गंडा घालून पसार झाला होता.
शेवगाव पोलीस ठाण्यात दि. २५ जुलै २०२४ रोजी एडी नावाने शेअर मार्केट ट्रेडिंग कार्यालयाचा संचालक अनिरुध्द मुकुंद धस (रा. एरंडगाव भागवत ता. शेवगाव) याचे विरोधात साईनाथ नामदेव भागवत यांनी तक्रार दाखल केली होती. त्यापासून आरोपी अनेकांना गंडा घालून फरार होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना आरोपी शहरामध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ दोन पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. शोध घेत असताना आरोपी धस हा त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना आरोपीला पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग करून मिरी रोडवरील सासरवाडी हाॅटेलच्यासमोर पकडले.
पोलीस ठाण्यात आणुन अटक केली आहे. या आरोपीने इतर कोणाची फसवणूक केली असल्यास, संबंधितांनी शेवगाव पोलिस ठाण्यात बिनधास्तपणे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नागरे यांनी केले आहे.





