Nagar : जवखेडेसह जिल्ह्यात शासकीय व इनामी जागेवर झालेले अतिक्रमण काढणार

मिरी : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील देवस्थानच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात स्थानिक नागरिकांनी उपोषण केले होते. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्याची दखल घेत आमदार मोनिका राजळे यांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका तसेच इतर शासकीय व देवस्थानच्या इनामी जागांवर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. आज झालेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करून ही गंभीर बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार राजळे यांनी विधानसभेत शासकीय आणि धार्मिक जमिनींवरील अतिक्रमणांचा प्रश्न उपस्थित करताच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शासकीय व इनामी जमिनीवरील सर्व अतिक्रमणे लवकरच काढली जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातीलअतिक्रमणधारकांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.
मिरी येथील अतिक्रमण निघणार का?
मिरी येथे देखील अनेकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेली आहेत. त्यामुळे महसूलमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मिरी ग्रामपंचायतीच्या व महसूल विभागाच्या जागेवर झालेले अतिक्रमणे देखील काढली जाणार का? यावर स्थानिक प्रशासन व महसूल विभाग काही तोडगा काढून व्यवसायिकांच्या दृष्टीने काही इतर उपाययोजना करणार याकडे सर्व मिरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. जर व्यावसायिकांचे अतिक्रमणे काढण्याची नामुष्की ओढावली तर अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत.





