Nagar : नळजोडणीच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे वसूल करू नका

श्रीरामपूर : श्रीरामपूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या अमृत २ विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांवर नको, अशा सूचना आमदार हेमंत ओगले यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
नुकतीच आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी कॅनॉलकडेच्या व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने दिलेल्या नोटिसांबाबत व्यापाऱ्यांसह नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेस शहर अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक आशिष धनवटे उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी अतिक्रमण नोटिसीसह सध्या चालू असलेल्या अमृत दोन योजनेच्या नळ जोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी उपस्थित केल्या.
आमदार ओगले म्हणाले की, सध्या श्रीरामपूर नगर परिषदेने १७८ कोटीची सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतलेले आहे, परंतु शहरातील नागरिकांना नव्याने नळ जोडणीच्या नावाखाली चार ते पाच हजार रुपयांची मागणी ठेकेदाराकडून होत असल्याचे निदर्शनास आले. याबाबतच्या अनेक तक्रारी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण असून, मुख्य ठेकेदाराने नेमलेले काही ठेकेदार हे नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनवरून नळ जोडणीसाठी सर्रास हजारो रुपयांची मागणी नागरिकांकडे करत आहे.
एकीकडे करोडो रुपयांची योजना राबवायची आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून नळ जोडणीच्या नावाखाली हजारो रुपये वसूल करायचे हे कसे चालेल, असा सवाल आमदार ओगले आणि ससाणे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. याबाबत आमदार ओगले यांनी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना सूचना दिल्या की, यापुढे अशा तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्या.
मुख्याधिकारी घोलप म्हणाले की, नागरिकांनी ठेकेदार अथवा त्याने नेमलेल्या माणसांकडे कुठलेही रक्कम नळ जोडणीच्या नावाखाली देऊ नये, अशी कोणी मागणी केल्यास याबाबत तातडीने नगरपरिषदेकडे संपर्क करावा, जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.





