नगर : आमच्या ताटातील भाकरीत वाटेकरी होऊ नका

विभागीय प्रदूषण आयुक्त खेडकर
पाथर्डी : मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे. त्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यांनी वेगळे आरक्षण घ्यावे. छत्रपती शाहू महाराजांनी आम्हाला आरक्षण दिले. तुम्ही देणारे आहात, आम्हाला देण्याची भूमिका घ्या.आम्ही बारा बलुतेदार आहोत. ऊसतोडणी, मोलमजुरी करून कष्ट करून पोट भरतो. आमच्या ताटातील भाकरीत वाटेकरी होऊ नका, असे आवाहन विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी केले.
नगर येथे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या ओबीसींच्या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक शहरातील गोरे मंगल कार्यालयात संपन्न झाली .यावेळी खेडकर बोलत होते. या वेळी अंबादास गारुडकर, सुभाष लोंढे, अनिल निकम, बाळासाहेब भुजबळ, डॉ. मृत्युंजय गर्जे, गोकुळ दौंड, रमेश गोरे, भगवान दराडे,
अशोक गर्जे, संभाजी पालवे, माणिक खेडकर, अशोक चोरमले, डॉ. रमेश हंडाळ, सुनील पाखरे,नागनाथ गर्जे, विष्णुपंत ढाकणे, दत्ता सोनटक्के, पांडुरंग सोनटक्के, अरविंद सोनटक्के, रवींद्र म्हस्के, दिनकर पालवे, आदिनाथ महाराज आंधळे, डॉ. कुलदीप भांडकर, राजेंद्र कोटकर,राजेंद्र दगडखैर, लक्ष्मण डोमकावळे, नवनाथ चव्हाण,रामराव चव्हाण, योगेश रासने यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेडकर पुढे बोलताना म्हणाले,राजकारण ,आपसातील मतभेद गट तट बाजूला ठेवून गोरगरीब ओबीसी समाजासाठी सर्वांनी एक होण्याची गरज आहे.या विषयावर राजकीय नेतेमंडळींनी सुद्धा तळ्यात की मळ्यात अशी भूमिका घेऊ नये. कोणत्याही समाजाशी आपल्याला तुलना करायची नाही मात्र, ओबींसीच्या हितासाठी आता सर्वानी एकत्र यायला हवे. लोकांशी संपर्क केल्याशिवाय लोक गोळा होत नसल्याने प्रत्येकाने आता गावोगावी संपर्क करावा.
या गोष्टीमध्ये कोणीही राजकारण आणू नये. निवडणूक आली की राजकारण करायला निवडणूका आहेत. राजकीय व्यक्तीने ठाम भूमिका घेतली तर कार्यकर्ते सुद्धा तशीच भूमिका घेतील.आपल्यावर जो अन्याय झाला आहे, त्या अन्याया विरोधात आता लढावे लागणार आहे. वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. भुजबळ यांच्या सभेसाठी आपण सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे शेवटी खेडकर म्हणाले. प्रास्ताविक रमेश गोरे तर आभार सुनील पाखरे यांनी मानले.
त्यांना आपल्या दारात येऊ देऊ नका
या मेळाव्यात जे तालुक्यातील राजकारणी मंडळी आली नाहीत त्यांना आपल्या दारात येऊ देऊ नका, असा ठराव दिनकर पालवे यांनी मांडला. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून संमती दिली.





