Nagar: मोजणीसाठी घेतलेली रक्कम देण्याची नामुष्की

श्रीगोंदा : कोर्ट कमिशनच्या आदेशाने मोजणीसाठी विना परवाना घेतलेले तीन हजार रुपये माघारी देण्याची पाळी श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील निमतेदार गोरक्षनाथ चव्हाण यांच्यावर आल्याची मोठी चर्चा श्रीगोंदा शहरात दिवसभर होत असल्याने भूमी अभिलेखचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
तालुक्यातील कोरेगाव येथील बाजीराव शेळके या अपंग शेतकऱ्याची कोर्ट आदेशाने मोजणी करण्याचे होते. श्रीगोंदा भूमिअभिलेख कार्यालयातील निमतेदार गोरक्षनाथ चव्हाण यांनी मोजणी करण्यासाठी शेतकऱ्याकडून मोजणी मशीन भाड्याने आणलेले असून त्याचे भाडे पोटी तीन हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून शेतकऱ्याकडून तीन हजार रुपये घेतले. मोजणी प्रकरण आजतागायत न्यायालयात जमा केले नाही. शेतकऱ्यांनी वारंवार हेलपाटे मारून फोन करून सुद्धा चव्हाण यांनी दाद दिली नाही.
या शेतकऱ्याने सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांच्या कानावर हा विषय घातल्याने टिळक भोस यांनी नाशिकचे उपसंचालक महेश इंगळे यांना हा विषय सांगितला, मात्र त्यांनी टोलवाटोलवी करून आमचे कर्मचारी असं करू शकत नाही, असा दावा करून कर्मचाऱ्यांचे गैर कृत्य पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
शुक्रवार दि. ४ एप्रिल रोजी भूमी अभिलेख कार्यालयमध्ये चव्हाण यांना जाब विचारला असता त्यांनी शेतकऱ्याकडून तीन हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. ते पैसे शेतकऱ्याच्या पाया पडून त्यांना परत दिले. गैरप्रकार मी परत करणार नाही व त्या शेतकऱ्याचे काम दोन दिवसतं पूर्ण करीन, अशी ग्वाही दिली. या व्हिडिओने उपसंचालक महेश इंगळे यांचा दावा खोटा ठरला. सामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन सुद्धा कामे केली जात नाही, यावरून श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला.





