Nagar| हद्दपार गुन्हेगाराला सत्काराच्या कार्यक्रमात ठोकल्या बेड्या

नेवासा, (प्रतिनिधी)- नेवासा पोलीस ठाण्याच्या पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातून दीड वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही या गुन्हेगाराच्या सत्काराचे आयोजन जंगी स्वरुपात करण्यात आले होते.
गावात सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना नेवासा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सत्कारानिमित्त गावात बॅनरबाजी करणारे समर्थक, कार्यक्रमाचे आयोजक आणि ढोल – ताशा तसेच फटाके फोडणाऱ्यांवरही नेवासा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. जुनेद शेख असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारीपदी निवड झाली असल्यामुळे जुनेदचे मूळ गाव असलेल्या देवगावात (ता.नेवासा) सत्काराचे आयोजन रविवारी करण्यात आलेले होते.
या सत्कारानिमित्त मित्रमंडळींनी गावात बॅनरबाजी केलेली होती. हा हद्दपार असलेला युवक गावात येताच ढोल – ताशांचा निनाद तसेच फटाक्यांची आतिषबाजी सुरू असतानाच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक साध्या गणवेशात देवगावात दाखल झाले.
सत्काराची लगबग सुरू असतानाच कार्यक्रमस्थळी पोलीस येऊन धडकले. पोलिसांना पाहून सत्कारमूर्ती हद्दपार सराईत गुन्हेगार शेख धूम ठोकण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला झडप घालून शिताफीने पकडून अटक केली.
त्याच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करणारे शाहीद इनामदार,सोहेल शेख, सोनू शेख, बॅनर बनविणारा संदीप कोलते, ढोल-ताशा वाजवणारे सिताराम डाके, दादासाहेब उत्तम वाल्हेकर, सौरभ डाके व फटाके फोडणारे यांच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





