Nagar: शेतकऱ्यांसाठी एकात्मिक मोबाईल ॲप निर्मितीचा निर्णय

शेवगाव : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना अचूक माहिती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित होणाऱ्या एकात्मिक मोबाईल ॲपच्या समितीवर पुणे येथील कृषी आयुक्तालयातील मृदू व जलसंधारण विभागातील तंत्र अधिकारी अधिकारी, शेवगावच्या सुकन्या वैशाली काकडे -आठरे यांची निवड झाली आहे.
या ॲपद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक अद्ययावत माहिती, सल्ला आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ३१ जानेवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार, कृषी विभागामार्फत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित ‘कृषी माहितीसाठी ‘ एक खिडकी ’ योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा भाग म्हणून हे मोबाईल ॲप विकसित केले जात आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या ॲपसंदर्भात शासनाला अहवाल सादर केला असून या अहवालातील शिफारशीनुसार शेतकऱ्यांना शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी अद्ययावत माहिती सहज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. हे ॲप १ एप्रिल पर्यंत कार्यान्वित करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यातील विविध कृषी अधिकारी आणि तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत वैशाली काकडे – आठरे यांचा समावेश करण्यात आला आहे. वैशाली काकडे या पुणे येथील कृषी आयुक्तालयात तंत्र अधिकारी मृदू व जलसंधारण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांचे पती संतोष काकडे हे चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





