Nagar : सहकार क्षेत्रात झालेल्या चुका दुरुस्त करा- राज्यपाल हरिभाऊ बागडे

शिर्डी : सहकार चळवळ बदनाम करण्याचे काम काही लोकांनी केले आहे. ज्या ठिकाणी ठेवींचे व्याज कमी, त्याठिकाणी ठेवींच्या परतीची हमी, ज्या ठिकाणी ठेवींचा दर जास्त त्या ठिकाणी ठेवी परास्त, असा टोला लगावत नवनवीन उपक्रम राबवून ज्या संस्था बिघडल्या, त्या चांगल्या केल्या पाहिजेत. संस्था लयास जात असेल, तर तिला वाचवायला हवं. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, ही सहकाराची कल्पना आता राहिली नसल्याची खंत व्यक्त करत झालेल्या चुका दुरुस्त करा. आम्ही या सहकाररुपी वटवृक्षाला पाणी घातले, तुम्ही मन घाला, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
शिर्डी शहरात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यपाल बागडे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. काशिनाथ दाते, सहकार विभागाचे अप्पर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, राज्य मल्टीस्टेट संस्थांचे अध्यक्ष सुरेश वाबळे, कर्नाटकचे आ. शशिकला जोल्ले, रंजीत हेत्तीयार, परदेशातील नेनिता मलबस, फिलिपाईन येथील नाम्पि व्हिजेल, सॅली जॉन बोटेन्मण, पलमूस हेवांगे, मॉरिशेस येथील जेम्स व्हीनस्लो, फेरॉन मॅरी म्यॅली जेनी, डक पेट्रिक केविन, नेपाळ येथील शिवजी सपकोटा, चंद्रप्रसाद ढाकला आदीसह राज्यातील डॉ. संजय होलम, उदय जोशी, सतीश मराठे, राजश्री पाटील, शैलेश कोतुरे , शरद जरे संभाजी निकम, महेश कदम, संतोष बिडवई, शरद जाधव, जवाहरलाल छाबडा, रवींद्र भोसले, भास्कर बांगर, धनंजय तांबेकर, वासुदेव काळे, शिवाजी कपाळे, कडूभाऊ काळे, रवींद्र कानडे आदींसह राज्यातील सुमारे ८ ते १० हजार पतसंस्थचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यातील पतसंस्था वाढीमध्ये काका कोयटे यांचे योगदान मोठे आहे.अनेक लोक सहकारावर मोठे झाले, मात्र ते सहकार विसरून गेले. ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण व्हायला पाहिजे तरच ठेवीदार सहकारी संस्थेत पैसे गुंतवतील. सहकारी कायद्यात बदल झाला पाहिजे. सहकार खात्याने राज्यातील ज्या सक्षम पतसंस्था आहेत, त्यांना शेतमाल साठवणुकीसाठी एक गोडाऊन देण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, राजकारण आणि सहकारी संस्था एकत्र आणता येत नाही. सहकाराला उज्वल भविष्य मिळवून देण्यासाठी ठोस नियमावली आखण्याची गरज आहे. सहकारी संस्थांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. सहकारी संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार कट्टीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे म्हणाले की, सहकारातील नैराश्याचे वातावरण दूर व्हावे, या भावनेने आम्ही राज्यात साडेतीन हजार किमीचा प्रवास सहकार दिंडीच्या माध्यमातून केला. ना. राधाकृष्ण विखे पाटील पतसंस्था चळवळीचे संकटमोचक असल्याचा त्यांनी उल्लेख केला. आमचा आक्रोश सहकार खात्याने ऐकावा, राज्यात १६ हजार पतसंस्था असून, २ कोटी ७ लाख सदस्य आहेत. राज्यातील दीड कोटी कुटुंबांशी आमच्या चळवळीचा दैनंदिन संबंध आहे. पतसंस्था हाच आमचा ध्यास आहे. पतसंस्थेच्या ठेवींना संरक्षण मिळावे, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे ते म्हणाले. यावेळी राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, डॉ.के.वाय गाडेकर, साहेबराव निधाने, डॉ.स्वाधीन गाडेकर, तसेच राज्यातून आलेले पतसंस्थेचे चेअरमन व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





