जामखेड : गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद असलेली श्री क्षेत्र चौंडी ते इंदोर एसटी बस सुरू व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग माने यांनी महामंडळाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर यास यश आले असून, जन्मभूमी ते कर्मभूमी असलेल्या चौंडी ते इंदोर एसटी बस सुरू करण्यात आली. आज पहाटे पाच वाजता जामखेड बसस्थानकातून एसटी बस सोडण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथन कर्मभूमी असलेले इंदोरपर्यंत एसटी बस चालू करण्यात आली होती. मात्र, तीन ते चार वर्षापासून ही बस बंद करण्यात आली होती. दि ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा होत आहे. यानिमित्ताने चौंडी ते इंदोर एसटी बस चालू करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गटाचे ) पांडुरंग माने यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली होती. याचा वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर आज दि. २९ रोजी चौंडी ते इंदोर एसटी बस चालू करण्यात आली. पहाटे पाच वाजता जामखेड बसस्थानकात पांडुरंग माने यांनी बसचे पूजन करून चालक, वाहक यांचा सत्कार करून बस मार्गस्थ झाली. यावेळी नितीन काशीद, दहिफळे, कुंडल राळेभात, सचिन शिंदे उपस्थित होते. ही बस सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.