Nagar : दहा कोटी खंडणीसाठी व्यापार्याचे अपहरण अन् खून

अहिल्यानगर : दि. 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या शहरातील व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय 68) यांचा अखेर खून झाल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी रात्री निंबळक बाह्यवळण रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत त्यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. पोलिसांनी या प्रकरणी निलंबित पोलीस कर्मचार्यासह दोघांना अटक केली असून दहा कोटीच्या खंडणीसाठी परदेशी यांचे अपहरण करण्यात आले होते. परदेशी यांच्याकडून पैसे न मिळाल्याने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
त्या दोघांनी परदेशी यांचे बोल्हेगाव येथील त्यांच्या घराबाहेरून अपहरण करून खून केल्याचे व नालीत मृतदेह लपवल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मृतदेह लपवल्याची जागा दाखवली. तेथून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.किरण बबन कोळपे (वय 38, रा. विळद, ता. नगर) व त्याचा साथीदार सागर गिताराम मोरे (वय 28, रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची 21 मार्चपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात 24 फेब्रुवारीपासून परदेशी हे बेपत्ता झाले होते. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात हरविल्याचा दाखल करणत आला होता. तोफखाना पोलिसांनी परदेशी यांचा शोध घेताना अनेकांचे जबाब नोंदवले होते. तसेच, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यात तीन ठिकाणी संशयास्पदरित्या इंडिका कार जाताना दिसली. त्याचा तपास केल्यावर ही कार किरण कोळपे वापरत असल्याचे समोर आले.त्यानुसार पोलिसांनी कोळपे व त्याचा साथीदार मोरे यांना ताब्यात घेतले. कोळपे व मोरे या दोघांनी परदेशी यांना मोटारगाडीमध्ये बसविल्यावर कोळपे याने परदेशी यांच्याकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली. मोरे याने परदेशी यांचे दोन्ही हात सिटला पकडून ठेवल्याने परदेशी झटापट करत होते. मोरेने नायलॉन दोरीने परदेशी यांचा गळा आवळला. परदेशी यांनी मोटारगाडीचा दरवाजा उघडला. त्यामुळे कोळपेने दोरीने परदेशी यांचे हात व पाय बांधले. निंबळक बाह्यवळण रस्त्यावर मोटारगाडी थांबवून दोघांनी परदेशी यांचा गळा दोरीने आवळून त्यांचा खून केला.
दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी,तर आरोपींच्या वतीने अॅड. महेश तवले व अॅड. संजय दुशिंग यांनी बाजू मांडली. आरोपींचा गुन्ह्याचा उद्देश काय, त्यांना खून करण्यासाठी कोणी सुपारी दिली आहे का, इतर साथीदार आहेत का, याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेली इंडीका कार जप्त करायची आहे, गुन्ह्याची पूर्व तयारी व कट कसा रचला, गुन्ह्यातील पुरावे हस्तगत करणे, आरोपींचे रक्ताचे व इतर नमुने घेणे, इतर कोणते वाहन व हत्यार वापरले का, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
वसुली सोडून परदेशींकडे खंडणी मागतिली
दिपक परदेशी यांनी किरण कोळपे याला विळद गावातील जगताप, भुजबळ, खरमाळे, अडसुरे यांच्याकडे असलेल्या थकीत रकमेच्या वसुलीचे काम दिले होते. या कामासाठी किरण कोळपे याने त्याच्या मदतीला ब्राह्मणी येथील सागर मोरे याला बोलावून घेतले होते. मात्र, पैसे वसूल करणे अवघड असल्याने दिपक परदेशी यांचे अपहरण करुन त्यांच्याकडून अधिक रक्कम वसूल करण्याची योजना आखली. परदेशी यांनी विळद येथील चौघांकडून थकीत रकमेच्या वसुलीचे काम दिले होते. मात्र, त्यांना ती रक्कम वसूल करता आली नाही. त्यामुळे परदेशी यांच्याकडूनच पैसे उकळण्यासाठी त्यांच्या अपहरणाची योजन आखल्याची कबुली या दोघांनी दिली.





