Nagar : आश्रमशाळेची आ. खताळ यांनी केली अचानक पाहणी

संगमनेर : आमदार अमोल खताळ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 21) साकूर येथे आदिवासी आश्रम शाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या सुविधांचा लाभ त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोहचवला जात नसल्याचे जाणवले. या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. शाळेवर मुख्याध्यापक कदम हजर नव्हते. ते राजूर प्रकल्प कार्यालय येथे बैठकीसाठी गेल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळून आल्या. निकृष्ट दर्जाच्या चपात्या, भाजी अत्यल्प प्रमाणात आणि जेवणात पोषणमूल्यांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. विद्यार्थ्यांना चांगले व पोषक अन्न मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असलेले वॉटर फिल्टर खराब अवस्थेत असून, विद्यार्थ्यांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही. आश्रमशाळेत पाण्याची व्यवस्था नाही, पाण्यासाठी येथे विहीर,बोअरवेल किंवा अन्य सुविधा नाही. गेल्या 23 वर्षांपासून पाणी विकत घेतले जाते व त्यापोटी आतापर्यंत कोट्यवधीची रक्कम अदा केली गेली आहे. ही गंभीर बाब निदर्शनास आली. विद्यार्थ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण जास्त असल्याचे जाणवले. तसेच वसतिगृह अधीक्षक राकेश गायकवाड यांनी पुरवठा रजिस्टरमध्ये अपूर्ण नोंदी ठेवल्याचे व रेकाॅर्ड व्यवस्थित मेंटेन न केल्याचे निदर्शनास आले.
आमदार खताळ यांनी या सर्व परिस्थितीची गंभीर दखल घेत शाळेतूनच थेट प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांना फोन करत शाळा व्यवस्थापनाला तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि शिक्षणाशी होणारा हलगर्जीपणा इथून पुढे सहन केला जाणार नाही, असे ठणकावून सांगितले आहे. यावर तातडीने उपाययोजना झाल्या नाहीतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आ. खताळ यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आ. खताळ यांनी आज थेट साकूर सब स्टेशनवर जाऊन शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकार्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर लगेचच आश्रमशाळेची अचानक पाहणी करून आश्रमशाळाअधीक्षकांची चांगलीच कानउघाडणी केल्याने साकूर परिसरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्यासमवेत भाजपचे युवा नेते गुलाबराजे भोसले, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, अॅड.अमित धुळगंड, संदीप खिल्लारी, भिमराज जाधव, मुबीन मोमीन, आरिफ मोमीन, अबुझर मोमीन उपस्थित होते





