Nagar : श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे सशस्त्र दरोडा

श्रीरामपूर : मुंबई येथे नगररचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपळे यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे असलेल्या वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री सहा जणांच्या कोयता गँगने दरोडा टाकून घरात एकट्या असलेल्या वृध्द महिलेला मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून २४ तोळे दागिने व ६० हजार रूपयांची रक्कम लूटून नेल्याची घटना घडली.
विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे (वय ७९) यांना दरोडेखोरांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंगल्यामध्ये त्या एकट्या राहत असल्याने सर्व दरवाजे लावून २८ मार्च रोजी रात्री झोपल्या होत्या. रात्री १ वाजेच्या सुमारास बेडरूमचा दरवाजाची कडी तोडून सहा इसम घरामध्ये आले. त्यांनी हिंदीमध्ये पैसे व दागिन्यांची मागणी केली.
कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. घरातील प्रत्येकी 24 तोळे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





