Nagar : अंबानी परिवार एकाच महिन्यात चार वेळा साई दरबारी

शिर्डी : जो जो मजे भजे जैसा जैसा भावे | तैसा तैसा पावे मीही त्यासी || या श्री साईबाबांच्या अकरा वचनाची अनुभती करोडो साईभक्तांना आजतागायत अनुभवयास आली आहे. याची अनुभूती सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे मालक नीता अंबानी, आकाश अंबानी यांना आली आहे. मागील महिन्यात अंबानी परिवार चारवेळा साई चरणी नतमस्तक झाले असून, साई दर्शनानंतर मुंबई इंडियन्स संघाची यशस्वी वाटचाल चाहत्यांना पहावयास मिळाली.
आयपीएलमध्ये सर्वात पहिली यशस्वी संघ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मुंबई इंडियन्सची १८ व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईला पहिल्या पाचपैकी चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. १२ एप्रिल रोजी हार्दिक पांड्याच्या नेतृत्यावाखाली मुंबई इंडियन्स संघ पाइंटस टेबलमध्ये नवव्या स्थानावर होता. त्यावेळी सर्वाना वाटले की, आता हा संघ तळातच राहील. त्यानंतर दि.१३ एप्रिल रोजी रिलायन्स उद्योग समूहाच्या उद्योजिका नीता अंबानी यांनी धूप आरतीला साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन साकडे घातल्यानंतर संघाने सामना जिंकत कमबॅक करत विजय रथावर स्वार झाले.
दि.२२ एप्रिल रोजी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी साई दर्शन घेतले. दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सने विजय मिळवत थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्यानंतर २७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सामना असल्यामुळे पुन्हा चार दिवसांनी दि २६ एप्रिल रोजी आकाश अंबानी आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी साई समाधीचे दर्शन घेतले आणि विजय घौडदौड सुरू ठेवली.
दि.६ मे रोजी सायंकाळी मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात विरुद्ध असल्यामुळे मध्यान्ह आरतीला आकाश अंबानी साईचरणी नतमस्तक झाले. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. साई समाधी दर्शनानंतर अंबानी यांनी द्वारकामाईमध्ये जाऊन दर्शन घेतले. आतापर्यंत आयपीएल २०२५ क्रिकेट सामन्यात मुंबई इंडियन्सने ११ पैकी ७ सामने जिंकले असून, अंकतालिकेत १४ गुण प्राप्त केले आहे.





