Nagar : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी

अकोले : आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक पालकांनी ३० एप्रिल पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण मिळावे, यासाठी सन २००९-१० पासून ही विशेष योजना राबवली जात आहे. निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १ लाखांपेक्षा कमी असावे.
विद्यार्थ्याचा जन्म १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान झालेला असावा. शासनाने मंजूर केलेल्या नामांकित शाळांमध्येच प्रवेश दिला जाईल. अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. विद्यार्थ्याने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेला नसावा.





