Nagar : 3200 मुली व महिलांचा सहभाग; एकविराच्या महिला क्रिकेटचा थरार सुरू

संगमनेर : माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवक व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत. मागील तीन वर्षापासून मुलींना क्रिकेट खेळण्याकरीता संधी मिळावी, यासाठी एकविरा फाउंडेशनच्यावतीने महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सुरू असून, याचा लौकिक आता राज्य पातळीवर झाला आहे. महिला व मुलींकरिता हे एकविरा मोठे क्रीडा व्यासपीठ ठरले असल्याचे गौरवाेद्गार मा.आ.डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. 3200 खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये महिला क्रिकेट व रस्सीखेचचा थरार सुरू झाला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ.जयश्री थोरात, सुधाकर जोशी, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, पूनम मुंदडा, सुनंदा दिघे, सायकलपटू प्रणिता सोमन, रुपाली औटी यासह विविध महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
डॉ.तांबे म्हणाले की, सध्या देशांमध्ये वुमन प्रीमियर लीग सुरू आहे. ही महिला क्रिकेट स्पर्धा लोकप्रिय ठरली आहे. मुलींच्या व महिलांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी डॉ.जयश्री थोरात यांनी मागील तीन वर्षापासून या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. ही स्पर्धा आता राज्य पातळीवर पोहोचली आहे. आरोग्य व महिला सबलीकरणासाठी एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून काम होत असून त्यांनी स्वयंरोजगारासाठी केलेला इंदिरा महोत्सव हा सर्व महिलांसाठी व्यवसाय व उद्योजकता यासाठी मार्गदर्शक ठरला होता. या स्पर्धांमधील तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, संगमनेरमधील अनेक गुणवंत खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर संगमनेरचा लौकिक वाढवत आहे. जिद्द आणि मेहनत केली तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. मुलींच्या करियरसह शिक्षण, आरोग्य आणि सबलीकरणासाठी एकविराच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे त्या म्हणाले. यावेळी प्रणिता सोमन हिने तरुणींशी संवाद साधला.





