पुणे | येरवड्यातील एन. के. गँगविरुद्ध मोक्का

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – येरवड्यातील एन. के. गँगच्या म्होरक्या निखिल कांबळे याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
यामध्ये निखिल उर्फ निक्या मधुकर कांबळे (२१), अतिब उर्फ बांडा अकील सय्यद ( १९, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा), रुपेश गायकवाड ( २२, रा. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेजवळ, येरवडा) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत.
याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
२४ ऑगस्ट रोजी कांबळे, सय्यद, गायकवाड आणि साथीदाराने तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून सोनसाखळी, अंगठी चोरून नेली होती. कांबळे आणि साथीदारांनी येरवडा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, विमानगर भागांत गंभीर गुन्हे केले आहेत.
यामध्ये वाहनांची तोडफोड केल्याच्या प्रकरणाचाही समावेश आहे. या टोळीवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या निरीक्षक पल्लवी मेहेर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदीप सुर्वे, सचिन माळी, सचिन शिंदे, मोनिका पवार यांनी तयार केला. सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.





