N.Biren Singh : मणिपूरमध्ये लवकरच स्थापन होणार सरकार; बिरेन सिंह यांनी व्यक्त केली शक्यता

इंफाळ : राष्ट्रपती राजवट लागू असणाऱ्या मणिपूरमध्ये लवकरच सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. तसे सूतोवाच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते एन.बिरेन सिंह यांनी शनिवारी केले. मणिपूरमध्ये लोकनियुक्त सरकार असावे अशी भाजप आणि मित्रपक्षांची इच्छा आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. जमिनीस्तरावरील स्थितीचा विचार करून लवकरच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, असे सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मणिपूरमधील सध्याच्या पेचावर आमचा फोकस आहे. राज्यातील शांततेसाठी तोडगा काढण्याच्या उद्देशातून आम्ही केंद्र सरकार आणि संबंधितांशी संपर्क ठेऊन आहोत. प्रत्येकालाच शांतता हवीय. मागील ७-८ महिन्यांत समुदायांमध्ये संघर्ष झाल्याचे कुठले वृत्त नाही, असेही त्यांनी नमूद केले. मणिपूरमध्ये मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाची ठिणगी पडली. त्यानंतर त्या राज्यात प्रदीर्घ काळ हिंसाचाराच्या घटना घडल्या.
त्यामध्ये सुमारे २६० जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे चौफेर टीकेचे धनी बनलेल्या सिंह यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर केंद्र सरकारने १३ फेब्रुवारीला मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. त्याशिवाय, विधानसभा निलंबित अवस्थेत ठेवण्यात आली. विद्यमान विधानसभेची मुदत वर्ष २०२७ पर्यंत आहे.



