म्यानमारमधील आणीबाणीला 6 महिन्यांची मुदतवाढ

बँकॉक – म्यानमारमध्ये गेल्या साडे ३ वर्षांपासून सत्तेत असलेल्या लष्करी राजवटीने देशात लागू असलेल्या आणीबाणीला आणखी ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. देशात निवडणुका घेण्याची तयारी खूप वेळ घेणारी असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे लष्करी शासनाने म्हटले आहे.
म्यानमारच्या सैन्याने १ फेब्रुवारी २०२१ रोजी आंग सान स्यू की यांच्या निवडलेल्या सरकारची हकालपट्टी केली आणि आणीबाणी घोषित करण्यात आली होती. स्यू की आणि त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाच्या सदस्यांना अटक केली होती. आणीबाणीद्वारे सरकारच्या सर्व प्रशासकीय कार्याचा ताबा सैन्याने घेतला आणि सत्ताधारी लष्करी परिषदेचे प्रमुख वरिष्ठ जनरल मिन आंग हलाईंग यांना विधिमंडळ, न्यायिक आणि कार्यकारी अधिकार दिले आहेत.
सध्या म्यानमारच्या लष्करी राजवटीसमोर वांशिक अल्पसंख्य गटांनी मोठे आव्हान उभे केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सीमेजवळच्या गावांमध्ये लष्कर आणि अल्पसंख्य गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. बंडखोर गटांनी काही गावांचा ताबा देखील घेतला आहे.





