“मोठ्या भावाने काळी जादू केली म्हणूनच मला कर्करोग झाला”; काळ्या जादूच्या संशयाने सख्खे भाऊ बनले पक्के वैरी

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथे भानामती व नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादूटोण्याच्या संशयावरून हातापाय बांधून अमानुष मारहाणीची घटना ताजी असताना आता अशीच एक धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. मात्र या घटनेमुळे सख्खे भाऊ पक्के वैरी झाले असल्याचे दिसत आहे.
चंद्रपुर शहरातील भिवापूर वाॅर्डातील पडदेमवार यांच्या कुटुंबातील चौघांना काळ्या जादूच्या संशयावरून बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
आरोपींना शनिवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. राम पडदेमवार व नारायण पडदेमवार हे दोघे भाऊ शेजारी राहतात. राम हे कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त आहे. आपल्यावर मोठ्या भावानेच काळी जादू केली म्हणूनच कर्करोग झाला असा संशय कुटुंबीयांना होता. यावरून दोन्ही कुटुंबात नेहमी वाद व्हायचा. घटनेची तक्रार शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात पूजा हिने दिली.
शुक्रवारी मोठा भाऊ नारायण टपरीवर चहा पिण्यासाठी गेले असता, राम यांच्या कुटुंबीयांनी नारायण यांच्याशी वाद घातला व मारहाण सुरू केली. यावेळी वडिलांच्या बचावासाठी नारायण यांचा मुलगा आकाश, आरती व पूजा या दोन मुली धावून आल्या. त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायदा आदी कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.





