Badminton : सिंधूला कामगिरीत सातत्य ठेवण्यासाठी मदत करणे, हेच माझे प्रमुख ध्येय – अनुप श्रीधर

PV Sindhu’s new coach Anup Sridhar :– भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू अजूनही यशासाठी भुकेली आहे. सिंधूला तिच्या कामगिरीत सातत्य ठेवण्यासाठी मदत करणे हेच प्राथमिक ध्येय असल्याचे प्रशिक्षक अनुप श्रीधर यांनी सांगितले.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर इंडोनेशियाच्या अँगस द्वी सँटोसोचा करार संपुष्टात आला. त्यानंतर अनुप श्रीधर यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाशिवाय परतलेली सिंधू सध्या हैदराबादमध्ये गचीबोवली येथील स्टेडियममध्ये अनुप श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 41 वर्षांचे श्रीधर यांनी भारताच्या लक्ष्य सेनला देखील प्रशिक्षण दिले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधूला चीनच्या हि बिंगजियाओ विरुद्धच्या लढतीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
काही आठवड्यांपूर्वी आम्ही चर्चा केली. त्यानंतर तिने या महिन्याचा सुरुवातीपासून सरावाला सुरुवात केली आहे. सरावादरम्यान आम्ही बरीच प्रगती केली असून आगामी काळात आम्ही युरोपीय स्पर्धामध्ये सहभागी होणार असल्याचाही अनुप श्रीधर यांनी बोलताना सांगितले. सिंधू फिनलंड येथे होणाऱ्या आर्कटिक ओपन (8 ते 13 ऑक्टोबर) व त्यानंतर ओडेन्स येथे होणाऱ्या डेन्मार्क ओपन (15 ते 20 ऑक्टोबर) स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे.
श्रीधर म्हणाले की, तुम्ही शीर्षस्थानी पोहचण्यासाठी योजना करू शकता परंतु फॉर्म टिकून राहावा यासाठी काहीच करू शकत नाहीत. त्यामुळे फॉर्म टिकवायचा असले तर सातत्याने सराव करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही केवळ पुढच्या काही स्पर्धांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. स्पर्धाच्या माध्यमातून सातत्य राखणे आणि विजेतेपदाकडे आगेकूच करणे एवढेच तुमच्या हातात असल्याचे श्रीधर यांनी सांगितले.
Macau Open 2024 (Badminton) : मकाऊ ओपनमध्ये त्रिशा-गायत्रीची विजयी सलामी….
प्रशिक्षकांमध्ये बदल…
सिंधूने गेल्या काही वर्षात प्रशिक्षकांमध्ये सातत्याने बदल केला आहे. टोकियो ऑलिम्पिकनंतर दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक पार्क ताई सेयुंग हे सिंधूपासून वेगळे झाले. त्यानंतर सिंधूने साईचे प्रशिक्षक असलेले विधी चौधरी यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर ऑल इंग्लंड चॅम्पियन मोहम्मद हाफीज हाशिमला नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. प्रकाश पदुकोण व अँगस द्वी सँटोसो यांच्याकडून देखील सिंधूने मार्गदर्शन घेतले आहे.





