Supriya Sule : माझं लेकरू खूप चांगलं होतं! अन् आईचा अश्रूंचा बांध फुटला; सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुबीयांची सात्वंनपर भेट, म्हणाल्या….

बीडः मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तब्बल ७० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापर्यंत त्यांच्या हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा छडा पोलिसांना लावता आलेला नाही. यामुळे आणि देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित इतर अनेक मागण्यांसाठी मस्साजोग गावातील गावकरी पुन्हा एकवटले असून त्यांनी अन्नत्याग आंदोलन उभे करण्याचा निर्धार केला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेतली. यावेळी सुळे यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.
2 महिन्यांपासून कृष्णा आंधले का सापडत नाही? बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नसल्याचे भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. त्यांनी देशमुख कुटुंबाशी संवाद साधल्यानंतर माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. मी कुणाला भेटणार नाही, तडजोड करणार नाही. माणुसकीच्या नात्याने मी हा लढा लढणार असल्याचे सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांना भेटणारः सुळे
मुख्यमंत्र्याना भेटून देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे देखील सुळे यांनी यावेळी सांगितले. बीडमधील सत्तेची आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे, असे देखील त्या म्हणाल्या. आम्हाला एक दिवसाआड या तपासाची अपडेट पाहिजे, अशी मागणी देखील सुळे यांनी सरकारकडे केली आहे.
माझं जसं लेकरू आहे तसं या मारेकऱ्यांना लेकरू असतील ना त्यांनमा मुलं, बायका नसेल का त्यांनी एवढं का केलं मी त्याची आई आहे आज मला काय वाटत असेल माझं लेकरू चांगलं होतं, अशी यातना देशमुख यांच्या आईने सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली. तसेच या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर पुन्हा आम्ही नंतर जगायचं कसं? असा प्रश्न सुळे यांना करताच मी तुम्हाला शब्द देते की मी तुमच्या मुलाला तर परत आणू शकत नाही. मात्र, मी तुमच्या नातवांना नक्कीच न्याय देईल. मी तुमच्यासाठी नक्कीच लढेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
देशमुख यांच्या आईला अश्रू अनावर
संतोष देशमुखने सगळ्या गावाचं चांगलं केलं. त्या दिवशी थोडेफार काही भांडण झाले असतील. तो म्हटला असेल मला मारू नका. पण त्याला संपवून टाकले. माझा जसं लेकरू आहे तसं या मारेकऱ्यांना लेकरू असतील ना. त्यांना मुलं, बायका नसेल का? त्यांनी एवढं का केलं? मी त्याची आई आहे आज मला काय वाटत असेल? माझं लेकरू खूप चांगलं होतं. मी आता काय करू? मी माझं लेकरू कुठे शोधू? असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुक आणि धनंजय देशमुख यांच्यासबोत सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली. आरोपी सापडत नाही यावर आपला विश्वास बसत नसल्याचे त्यांनी सांगितले.





