‘माझ्या मुलीला शिवीगाळ केली जाते’, सुनील शेट्टी ट्रोल करणाऱ्यांवर भडकले

मुंबई – सोशल मीडियावर अनेक बॉलीवूड कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा काही सेलिब्रिटी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही देतात. तर काही कलाकार याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करतात. यावर आता अभिनेता सुनील शेट्टीनेही संताप व्यक्त केला आहे. अनेक वेळा सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीला ट्रोल केले जाते. यामुळे खूप वाईट वाटत असल्याची भावना सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली.
नुकताच सुनील शेट्टी यांना ‘द रणबीर’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सुनील शेट्टी यांना आधुनिक युगात सोशल मीडियाची वाढती क्रेझ आणि प्रभाव याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर सुनील शेट्टी म्हणाले, “सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात प्रायव्हसी शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. एखादं वक्तव्य 15 विविध प्रकारे एडिट केलं जातं आणि त्याचे 15 विविध अर्थ काढले जातात. त्यामुळे मला मोकळेपणे बोलण्याचीही भीती वाटते.”
“कोणत्याही गोष्टीवर मतं मांडताना तुम्ही आम्हाला विचार करायला भाग पाडता. कारण जे आम्ही केलंच नाही त्यावरूनही सतत आमच्यावर टीका होत असते. हे टीका करणारे कोण असतात? ज्यांनी मी ट्विटर आणि फेसबुकवर ओळखत सुद्धा नाही. माझ्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली जाते, माझ्या कुटुंबीयांना आणि मुलीला शिवीगाळ केली जाते. हे सर्व कशासाठी? ते वाचून मला खूप वाईट वाटतं. कारण मी जुन्या विचारांचा आहे”, असंही ते म्हणाले.
View this post on Instagram
अथियाला अनेकदा तिच्या कपड्यांवरून आणि अभिनयावरून ट्रोल करण्यात आलं आहे. यावरूनच सुनील शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सुनील शेट्टी हे नुकतेच ‘हंटर’ या वेब शोमध्ये दिसले होते. त्यानंतर आता ते लवकरच ‘हेरा फेरी 3’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.





