मुख्यमंत्रीपदावरून मविआत जुंपली ! संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानावर नाना पटोले म्हणतात, ‘काँग्रेस हाच मोठा….’

Sanjay Raut | Uddhav Thackeray | Nana Patole – विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी आणि महायुती यांनी सुरूवात केली आहे. मात्र, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून स्पर्धा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असे विधान केले आहे. तसेच काँग्रेसकडे कोणता मुख्यमंत्रीपदा करता चेहरा आहे ते सांगावे असे आव्हानच त्यांनी दिले आहे. यामुळे मविआत वाद वाढण्याची शक्यता आहे.
ठाण्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचीच री पुन्हा एकदा ओढली आहे. 2019 मध्येही मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे संजय राऊत म्हणाले.
जर काँग्रेस आणि नाना पटोले यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा कुठला चेहरा असेल तर त्यांनी सांगावे, असे आवाहन राऊत यांनी दिला. नाना पटोल माझे मित्र आहेत. महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे ते मी सांगत आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच मोठा पक्ष ठरेल, असे नाना पटोले म्हणाले.
शिवाय मुख्यमंत्रीपदाबाबत अजूनही महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाही. निवडणुकीला आम्ही आघाडी म्हणूनच सामोरे जाणार आहोत. जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या शंभर जागाही निवडून येणार नाहीत, असा दावा पटोले यांनी केला.
तिन्ही पक्षाचे नेते निर्णय घेतील
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार आहे.
त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात आणि आमचे कार्यकर्ते काय म्हणतात याला काही अर्थ नाही. ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील, त्यावेळी त्यावर निर्णय होईल. काँग्रेसकडे चेहरे पण आहेत आणि ताकद ही आहे. ही वस्तूस्थिती राऊतांनी स्विकारली पाहीजे, असे थोरात म्हणाले.





