बिहार निवडणुकीपूर्वी नीतीश कुमारांना धक्का! जेडीयूचा आणखी एक दिग्गज नेता बाहेर

मुझफ्फरपूर – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल युनायटेड (जेडीयू) ला मोठा धक्का बसला आहे. मुझफ्फरपूर जिल्हा जेडीयूचे माजी अध्यक्ष रणजित सहनी यांनी पक्षाच्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यत्वासह पक्षाच्या राज्यस्तरीय राजकीय सल्लागार समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष आपल्या घोषित धोरणांपासून आणि नैतिक मूल्यांपासून भटकला असून, काही मोजक्या व्यक्तींनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना भ्रमित करत स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी पक्ष कमकुवत केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
शनिवारी मुझफ्फरपूरमधील कच्ची-पक्की येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रणजित सहनी यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. त्यांनी पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र पाठवून आपला निर्णय कळवला आहे. “मी जेडीयू सोडला आहे, पण एनडीए सोबत राहणार,” असे स्पष्ट करताना त्यांनी पुढील राजकीय दिशा समर्थकांशी चर्चा करून ठरवणार असल्याचे सांगितले. सध्या ते निषाद संघर्ष मोर्चा या सामाजिक संघटनेसोबत समाजकार्य करणार आहेत.
जेडीयू कमकुवत, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो –
रणजित सहनी यांनी राजीनाम्यामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले की, जेडीयू आता आपल्या मूळ धोरणांवर आणि नैतिक मूल्यांवर चालत नाही. काही मोजक्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांना भ्रमित करत स्वतःच्या हितासाठी पक्षाला कमकुवत केले आहे. “पूर्वी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकले जायचे, पण आता त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले जात नाही,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, भाजप, काँग्रेस आणि राजदमधून आलेल्या काही व्यक्तींनी पक्षावर कब्जा केल्याने जिल्हा आणि राज्य स्तरावर पक्षाची ताकद कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.
राजीनाम्यांचे सत्र सुरू –
रणजित सहनी यांनी दावा केला की, जेडीयूमध्ये आता राजीनाम्यांचा सिलसिला सुरू झाला आहे. यापूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते ठाकूर हरिकिशोर सिंह आणि राज्यस्तरीय राजकीय सल्लागार समितीचे सदस्य अवध किशोर पटेल यांनीही पक्ष सोडला आहे. यापूर्वी पक्षसंघटनेत बदलासाठी चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यावेळी माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.




