Mutual Funds : ‘करेक्शन’ म्युच्युअल फंडासाठी ठरले लाभदायक….

मुंबई – ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी सात टक्क्यांनी कमी झाले. मिडकॅप सहा टक्क्यांनी तर स्मॉल कॅप तीन टक्क्यांनी कोसळला. कंपन्यांचे सुमार ताळेबंद आणि चीनमधील सवलतीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात 94 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. मात्र या करेक्शनचा फायदा घेत म्युच्युअल फंडांनी ऑक्टोबर महिन्यात 92 हजार कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे.
आता परिस्थिती बदलल्यानंतर फंडांना आणि फंडाच्या खातेदारांना बराच नफा होण्याची शक्यता आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजे एनएसडीएलने यासंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार निफ्टीतील 15 शेअर मध्ये म्युच्युअल फंडांनी 45 हजार कोटी रुपये गुंतविले आहेत. या ब्लूचिप कंपन्यांच्या ताळेबंदावर परिणाम झाला असला तरी दीर्घ पल्ल्यात या कंपन्या नफादायक राहणार आहेत याची जाणीव फंडांना असल्यामुळेच फंडांनी या कालावधीत खरेदी चालू ठेवून निर्देशांकांना आधार दिला.
सध्या असलेली नकारात्मक परिस्थिती लघु पल्ल्यातील आहे. दीर्घ पल्ल्यात अर्थव्यवस्था बळकट राहणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकानंतर केंद्र सरकार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवून विकासदराला चालना देणार आहे. याची जाणीव फंडांना असल्यामुळेच त्यांनी या कालावधीत चांगल्या कंपन्या निवडून बरीच गुंतवणूक केली.
म्युच्युअल फंडांनी केवळ ब्लूचिप कंपन्यातच गुंतवणूक केली नाही तर निवडक आयपीओमध्ये या कालावधीत 9,600 कोटी रुपये गुंतविले आहेत. फंडांची आयपीओमधील एकूण गुंतवणूक आता 38,686 कोटीवर गेली आहे.
EC & CTE : उद्योगांना दोनवेळा मंजुरी घेण्यापासून सूट, सरकारने ‘ती’ मागणी केली मान्य….
ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंडानी महिंद्रा मध्ये 8,641 कोटी, एचडीएफसी बँकेत 5,757 कोटी, अॅक्सिस बँकेत 4,116 कोटी, आयसीआयसीआय बँकेत 3,897 कोटी, स्टेट बँकेत 3,105 कोटी, बजाज ऑटोत, 2,924 कोटी, एल अँड टीमध्ये 2,517 कोटी, इंडसइंड बँकेत 2.409 कोटी, टीसीएस कंपनीत 2,402 कोटी, हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये 2,362 कोटी, मारुती सुझुकी इंडियामध्ये 2,355 कोटी, भारती एअरटेलमध्ये 1,231 कोटी, अंबुजा सिमेंट मध्ये 1,636 कोटी तर ईशर मोटारमध्ये 1631 कोटी रुपये गुंतविले आहेत.




