मटकाकिंग जिग्नेशची मित्राकडूनच हत्या

कल्याण – मटका किंग जिग्नेश ठक्कर याचा कल्याण स्टेशनजवळील प्रसिद्ध नीलम गल्लीत गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. ही हत्या जिग्नेशचा बालपणीपासूनचा मित्र असलेल्या गॅंगस्टर धर्मेश उर्फ नन्नू शाह यानेच केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी संशयीत आरोपी धर्मेश शहा व चेतन पटेल आणि जिग्नेश ठक्कर यांच्यामध्ये वाद झाले होते. तसेच हातापायी देखील झाली होती. याबाबतचा परस्पर विरोधी गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदवला गेला होता. तर जिग्नेश ठक्कर याने चेतन पटेल याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावर पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
यावरून राग धरून धर्मेशने जिग्नेशवर चार गोळ्या झाडल्या. त्याला पोलीसांनी तातडीने फोर्टिज रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचे निधन झाले. जिग्नेश याचे कल्याण आणि ठाण्यात मटक्याचे अड्डे तसेच एक रमी क्लबही होता. तसेच त्याच्याविरुद्ध क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेतल्याचेही आरोप होते.





