मुस्लिम देशांनी फेटाळला डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ प्रस्ताव

डेर अल-बलाह (गाझा पट्टा) – गाझाच्या फेरनिर्माणाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेला प्रस्ताव मुस्लिम देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. गाझा पट्ट्यातील पॅलेस्टिनींची लोकसंख्येला तेथून जॉर्डन किंवा इजिप्तमध्ये हलवण्यात यावे. आणि मगच गाझामध्ये फेरनिर्माण करण्यात यावे, असे ट्रम्प यांनी सुचवले होते. या प्रस्तावावरच्या पर्यायासाठी विचार करण्यासाठी ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामामिक कोऑपरेशनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जेद्दाह येथे झाली.
या बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात गाझाच्या फेरनिर्माणाला पुर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला. हा पर्याय इजिप्तच्या पुढाकाराने मांडण्यात आला होता. मात्र सौदी अरेबिया आणि जॉर्डनने ट्रम्प यांच्या मतानुसार पॅलिस्टिनींना तेथून हलवण्यास विरोध दर्शवला. ऑर्गनायजेशन ऑफ मुस्लिम कोऑपरेशन या इस्लामी देशांच्या संघटनेमध्ये ५७ देशांचा समावेश आहे.
पॅलेस्टिनींना व्यक्तिशः किंवा सामुहिकपणे गाझामधून हटवण्याच्या पर्यायाला आपला विरोध असल्याचे ट्रम्प यांचा नामोल्लेख टाळून म्हणण्यात आले. पॅलेस्टिनींना हलवणे म्हणजे वांशिक नाश करण्यासारखे असेल. ते नेतिक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्याही विरोधात असेल.
तसेच असे करणे म्हणजे मानवतेविरोधातला गुन्हा असेल. उपासमारीचे धोरण राबवल्यामुळे पॅलेस्टिनींना तेथून निघून जाण्यास भाग पाडण्यासारखे असेल, असे सांगून या धोरणावरही टीका करण्यात आली आहे. गाझाच्या फेरनिर्माणाच्या मुद्यावरच्या या बैठकीवर इस्रायलने जोरदार टीका केली आहे. गाझामध्ये हमासला कोणतेही स्थान असता कामा नये या आपल्या भूमिकेचा इस्रायलने पुनरुच्चार केला आहे.
सीरियाला पुन्हा गटामध्ये स्थान –
सीरियाला इस्लामी देशांच्या संघटनेमध्ये पुन्हा स्थान देखील देण्यात आले आहे. सीरियाचे माजी अध्यक्ष बशर अल असद यांनी आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर केलेल्या क्रूर अत्याचारांमुळे २०१२ मध्ये सीरियाला ओआयसीमधून हटवण्यात आले होते. सुमारे १४ वर्षांच्या गृहयुद्धानंतर डिसेंबरमध्ये इस्लामी नेतृत्वाखालील बंडखोरांनी असद यांना पदच्युत केले आणि त्यानंतर सीरियामध्ये एक हंगामी सरकार स्थापन केले गेले.





